Saturday, April 27, 2013

क्रोशाच्या सुईने साखळी विणणे.


चला  आज आपण क्रोशा शिकुयात. घाबरू नका एकदम सोपे आहे. छोट्या - छोट्या गोष्टी शिकुयात इथे.
पहिल्यांदा क्रोशाची सुई दिसते कशी ते पाहुयात.

क्रोशाची सुई
 क्रोशाच्या सुईकडे नीट पहा. चित्रात बाण दाखवला आहे तिथे एका बाजूला तिला बाक आहे. या बाकमुळे सुईत  दोरा छान अडकू शकतो. याचाच फायदा आपल्याला क्रोशा विणकामात होतो.
आता या सुईने आपण लोकरीच्या धाग्याने काही गमती जमाती करूयात. सर्वात आधी साखळी शिकुयात. या साखळी वरती नंतर आपण गमती जमती करूयात.

  साखळी

आपण आता पहिला टाका कसा तयार करायचा शिकुयात.

१.दो-याचा गुंडा डावीकडे ठेवा. दो-याची सुरूवातीचे टोक उजव्या हातात घ्या. डाव्या हाताच्या बोटाभोवती या दो-याचे दोन वेढे घाला. आता सुरुवातीचे टोक सोडून द्या.
२.डाव्या हाताच्या बोटावरच्या दोन वेढ्यांपैकी डावीकडचा वेढा थोडा ओढून उजवीकडच्या वेढ्यावरून पलीकडे न्या.
३.आता पुन्हा डावीकडचा वेढा थोडा ओढून उजवीकडच्या वेढ्याच्या वरून पलीकडे न्या.
४. बोटावरून खाली काढून टाका.
५.आता खाली आलेली दोन्ही दो-याची टोके ( सुरुवातीचे टोक अन गुंड्याला सलग्न असलेले टोक) थोडे ओढून बोटाखालची गाठ घट्ट करा.
६. आता हलकेच बोटावरचा वेढा काढून घ्या. ही आपली पहिली साखळी. त्यात क्रोशाची सुई घाला. गुंड्याला सलग्न दोरा ओढून टाका सुईवर घट्ट करा. सुई व त्यातली साखळी नीट बाजूला ठेवा.

 
आता गुंड्यातून दोन अडिच फूट दोरा सोडवून घ्या. "गुंड्याच्या बाजूने सुईत अडकलेल्या दो-याकडे" हा दोरा डाव्या हाताच्या तर्जनीवर गुंडाळा. हे गुंडाळताना फार घट्ट गुंडाळू नका, नाहीतर बोट काळे निळे होईल. तसेच फार सैलही गुंडाळू नका, नाहीतर हे गुंडाळलेले वारंवार सुटेल. सवयीने किती घट्ट किती सैल याचा अंदाज येतो.
उजव्या हातात पेन धरतो तशी सुई धरा. डाव्या बोटावर दोरा इतका गुंडाळा की ज्यान्वये सुईतील टाका आणि हे बोट यांच्यात साधारण २ इंच अंतर राहील.
आता उजव्या हातात सुई पेन धरतो तशी धरा. डावा अंगठा आणि मधले बोट यात सुईतल्या साखळी खालचा धागा धरा. आता सुईचे टोक अंगठा आणि दोरा याच्या मध्ये न्या. (दोरा सुई खाली असला पाहिजे.) आता डाव्या बोटाच्या तर्जनीला थोडे सैल करा आणि सुईचे टोक  दो-याखालून उजवीकडे वळवून थोडे वरच्या दिशेला तोंड करून न्या. आता डाव्या हाताची तर्जनी जरा ताणून हळुहळू सुई मागे घ्या. आता लक्षात येईल की नवा धागा सुईवर आला आहे, आणि तो सुईला जो बाक आहे त्यात अडकतो आहे.
आता अशीच सुई अजून मागे घ्या आता सुईवरच्या पहिल्या साखळीतून हा नवा अडकलेला धागा ओढून घ्या. हवे तेव्हढे डावी तर्जनी सैल ठेवा. हळुच हा सुईत अडकलेला धाका पहिल्या साखळीतून बाहेर काढून घ्या. आता पहिली साखळी खाली. अन त्यातून वर आलेली दुसरी साखळी सुईवर आलेली दिसेल.
मदतीसाठी व्हिडीओ ( आवाजासह ) पहा.
No comments:

Post a Comment